उन्हाळ्यात आहार कसा असावा ? काय खावे आणि काय खाऊ नये

बदल हा नैसर्गिक नियम आहे. त्यामुळे ऋतु बदलला तसा आपल्या दैनंदिन जीवनात बदल करणे आवश्यक आहे. त्यात सर्वात महत्त्वाचे असते आपला आहार. ज्या आहारावर शारीरिक असो वा मानसिक दोन्ही आरोग्य अवलंबून आहे, त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्येक ऋतूप्रमाणे आपला आहार कसा असावा हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. आजुबाजुची परिस्थिती बदलली कि मानवी शरीरावर त्याचा परिणाम होतोच. नुकतीच उन्हाळ्याची चाहूल लागली आहे म्हणून आहाराबद्दल भरपूर प्रश्न मनात येतात त्याची बहुतांश उत्तरे मिळतात पण त्यातले नेमके काय बदल करावे हे जाणून घेऊया या लेखाद्वारे..

मानवी शरीरात ७० टक्के पाणी असते. पण उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासते त्यालाच डिहायड्रेशन म्हणतात. डिहायड्रेशन टाळण्यासाठी जास्तीत जास्त पाणी असणारे फळ, पालेभाज्या यांचा आहारात समावेश करावा. तसेच प्रोटीन, कॅल्शिअम, फायबर युक्त पदार्थांचे सेवन करावे. आहार नियोजन म्हणजे कमी खाणे नाही तर संतुलित आहार घेणे होय. जिभेला काय चांगलं लागतं त्यापेक्षा शरीरासाठी काय गरजेचे आहे हे समजून आहारात बदल करावा.

उन्हाळ्यात आहार कसा असावा

उन्हाळ्यात काय खावे व काय करावे?

पुढे आपणास उन्हाळ्याच्या दिवसात कोणत्या पदार्थांचे सेवन (उन्हाळ्यात काय खावे) व कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे याविषयी माहिती देत आहोत.

  • निरोगी आरोग्यासाठी दररोज निदान ३ ते ४ लिटर पाणी प्यावे. पाणी माठातले असेल तर अतिउत्तम. उन्हाळ्यात घाम जास्त येतो म्हणून पाण्याची कमतरता राहते त्यामुळे आठवणीने पाणी पिणे हा उत्तम उपाय आहे.
  • पाण्याव्यतिरिक्त उसाचा रस, नारळ पाणी, ज्युस (शक्य असल्यास घरगुती बनवलेला) लिंबू पाणी, ग्लुकोज पाणी, कैरी पन्ह, मठ्ठा, कोकम सरबत इत्यादींचे उन्हाळ्यात प्रमाण वाढवणे कधीही चांगले. तसेच जीरे, बडिशेप यांचे मिश्रण करून तयार केलेले पेय फायदेशीर ठरते.
  • थंड आणि जास्त पाणी असणारे फळ खावे जसे कि सफरचंद, चिकू, डाळिंब, टरबूज, किवी यासारखी फळे आहारात समाविष्ट करावीत.
  • भाज्या मध्ये पालक, गाजर, काकडी, कोबी, कांदा, कोशिंबीर, पुदिना, भेंडी, बीट यांचा आहारात जास्तीत जास्त उपयोग करणे गरजेचे आहे. याशिवाय सलाद हा छान पर्याय असू शकतो.
  • उन्हाळ्यात कच्च्या कांदा खाणे व उन्हात जातांना कांदा सोबत ठेवणे देखील गुणकारी ठरते.
  • धान्या मध्ये ज्वारी ही थंड असते त्यामुळे ज्वारीची भाकरी यांचा समावेश करू शकता. याशिवाय मुग दाळ ही इतर दाळींपेक्षा थंड असते म्हणून या डाळीची भाजी केली जाऊ शकते.
  • दूध, दही, तूप, ताक, सब्जा बी पिल्यास शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहील. अधिक पाण्याची कमतरता जाणवणार नाही. थंड असल्या कारणाने शरीराची दाहकता कमी होईल.
  • सब्जा बी हे पचनक्रियेसाठी लाभदायक आहे आणि थंड असल्यामुळे पाण्यात किंवा लिंबूपाण्यात मिक्स करून घेऊ शकता. याद्वारे आरोग्य निरोगी राहण्यासाठी प्रोटीनचा पुरवठा होतो.
  • सकाळच्या नाश्त्यामध्ये इडली-डोसा असावा. त्यात मोठ्या प्रमाणात पौष्टिक घटक असतात आणि हा पचनास अतिशय हलका नाश्ता असतो. आठवड्यातून एक किंवा दोन वेळा हा नाश्ता असावा .
  • चहा कितीही आवडत असला तरी उन्हाळ्यात मात्र चहा सेवनाचे प्रमाण कमी करावे. त्याऐवजी ज्युस किंवा हर्बल टि ला प्राधान्य द्यावे.
  • साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी गोड पदार्थांचा उन्हाळ्यात जास्त समावेश करावा त्यात गाजर, बीट यांचा हलवा, मुगाचा शिरा इ.
  • उन्हाळ्यात एकाचवेळी जास्त जेवण जात नाही किंवा खाण्याची इच्छा होत नाही त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने जमेल तसे विविध पदार्थ खावे त्यात मनुका, फ्रुट सलाद इ.
  • उन्हाळ्या म्हटलं कि आंब्याचा सिझन, पण आंबा उष्ण, त्यामुळे जिभेचे चोचले पुरवताना शरीराला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • संध्याकाळी ६ ते ७ च्या दरम्यान स्नॅक्स मध्ये कडधान्याची चाटभेळ हा पर्याय घेऊ शकतो. लहान मुले आवडीने खातील.
  • रात्रीचा आहार असा असावा जो पचन्यास हलका असेल. त्यात खिचडी, दाळ भात, हे पर्याय म्हणून घेऊ शकता.
  • जास्त काळ टिकणारे पदार्थ करावे जसे लोणचे, मुरंबा जेणेकरून मध्ये मध्ये खाण्यास उपलब्ध राहील. जेवण्यास रंगत आणण्यासाठी कोशिंबीर आणि चटणी यांची मदत घेता येईल.

उन्हाळ्यात काय खाऊ नये?

  • फ्रिजमध्ये ठेवलेले पाणी, पदार्थ हे वरून जरी हवेहवेसे वाटत असेल तरी शरीरासाठी हानीकारक आहे. उन्हाळ्यात शरीराचे तापमान अधिक असते त्यामुळे सेवन करतांना फ्रिजमधल्या पदार्थांचे आणि शरीराचे तापमान यांचा समतोल साधणे कठीण होते.
  • उन्हाळ्यात अन्न लवकर खराब होते त्यामुळे फार काळ राहिलेले अन्न खाऊ नये. ताज्या अन्नाला प्राधान्य द्यावे. स्त्रीयांनी ही बाब आवर्जून पाळावी .
  • बाहेरचे खाणे, जंक फूड तसे तर उन्हाळ्यात थोडे कमीच करावे पण खात असल्यास अति तिखट आणि अति तेलकट पदार्थ टाळावे.
  • उन्हातून आल्यावर लगेच थंडगार पाणी पिऊ नये. दुपारच्या कळकळीत उन्हात आईस्क्रीम खाणे थोडे टाळावे.

एकंदरीत काय तर नैसर्गिकरित्या थंड असणाऱ्या पदार्थचे सेवन शरीरासाठी कधीही उत्तम. वयानुसार लहान मुले, वृद्ध यांच्या शारीरिक श्रमानुसार आहारात बदल करावा लागतो. असे एकाच मापात प्रत्येकाला बसवता येत नाही. त्यांच्या आरोग्यानुसार उन्हाळ्यात काळजी घ्यावी.

शारीरिक आरोग्य सांभाळण्यासाठी जसे आहारात बदल केला जातो तसाच मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी सुद्धा दैनंदिन जीवनात थोडा बदल आवश्यक आहे. तो ही एक प्रकारचा आहारचं होतो.

उन्हाळा हा मुळात थोडा निरुत्साह घेऊन येतो पण स्वतःला उत्साही ठेवण्यासाठी विविध छंद जोपासणे केव्हाही बरे . पुस्तक वाचन, बागकाम, क्राफ्टिंग , चित्र काढणे , घरात संवाद साधणे यासारखे छंदही मानसिक आरोग्यास लाभदायक ठरू शकतात.अशा सकारात्मक गोष्टींसोबत सकस आणि संतुलित आहार घेतला तर त्याचा फायदा शरीर आणि मन दोघांनाही होईल.

उन्हाळा असा दाहकता घेऊन येतो तेव्हा त्याला घालवण्यासाठी गारवा आपल्या जगण्याच्या पद्धतीने निर्माण करावा लागतो. त्यामुळे आहारात बदल करता करता दैनंदिन जीवनात ही बदल करावा जेणेकरून उन्हाळात शरीराची काळजी घेऊन तो जगता येईल.

आला आला उन्हाळा
आरोग्य तुमचे सांभाळा
बदला आता तो जुना आहार
कराल तेव्हाच मनसोक्त विहार….

आला आला उन्हाळा
आरोग्य तुमचे सांभाळा
आला तो इतका घेऊन पारा की
तुम्ही पण घ्या आता स्वतः ची काळजी जरा…

मेघाली प्रधान
(अमरावती)

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा